रत्नागिरी : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रेल्वेने () प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. शनिवारपासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे आरक्षण आहे, अशाच प्रवाशांनी स्थानकात यावं, आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही, असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं आहे .

मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने या वर्षी मोठं नियोजन केलं आहे. तब्बल २२५ पेक्षा अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांना कोकणात आणत आहे. गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाचंही कोकण रेल्वेने नियोजन केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तसंच नोंद घेतली जात आहे. आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियंत्रण केलं जात आहे.

दरम्यान, आता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. यावेळी केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार आहे. ज्याच्याकडे आरक्षण नाही अशा मंडळींनी स्थानकावर गर्दी करू नये, त्यांना स्थानकाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आरक्षण असलेल्या प्रवाशांनीही तपासणीसाठी आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित राहावं, असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here