मुंबई: मुंबई: ‘मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळं चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे,’ असा सवाल यांनी आज केला.

वाचा:

कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं आज विधान भवनात सरकारच्या वतीनं मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवं स्वीकारताना जुन्याला विसरू नका. मराठी सोबत घेऊन पुढं चला, असं आवाहन उपस्थितांना केलं. ‘मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. काय होणार मराठीचं ही चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे का? असं इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असं असताना चिंताग्रस्त भावनेनं हा दिवस साजरा का करायचा,’ अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली.

‘मराठी भाषा अभिजात होईल की नाही हा वेगळा प्रश्न आहे. त्याचे काही निकष आहेत. पण मराठीनं दिलं काय हा महत्त्वाचा भाग आहे. शिवाजी महाराज नसते तर मराठी भाषेचे पुरावे मागणारे जन्माला आले असते का,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ‘इतर भाषाही जुन्या आहेत. आम्हाला त्यांचा आदर आहे. पण तुम्ही दिला काय, हा प्रश्नच असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव शाळा का नाही, असं कधी-कधी वाटतं. मराठी सक्तीची का करायची त्यामागचं कारण हेच आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य झाली पाहिजे, हा कायदा मी मुख्यमंत्री असताना करता आला हे माझं भाग्य आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here