: शहरातील देवळाई परिसरातील एका घरात शनिवारी (११ सप्टेंबर) भरदिवसा चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने एकाच घरात दोन वेळा कपडे बदलून चोरी केली. या घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शालीकराम मैनाजी चौधरी (२९, रा. मुळ पिंप्री खंदारे, ता.लोणार, सध्या. देवळाई परिसर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. शालीकराम यांनी ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी कोमल यांना सायंकाळी सहा वाजेदरम्यान गजानन महाराज मंदीर परिसरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलं होतं. त्यांच्या पत्नी तेव्हापासून घटने दरम्यानही रुग्णालयात भरती होत्या.

शालीकराम हे ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पुन्हा घरुन रुग्णालयात गेले आणि सायंकाळी पाच वाजता पुन्हा घरी परत आले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचं दिसलं. अवघ्या तीन तासात घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील दोघा पतीपत्नीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, लॅपटॉप, मिक्सर, इस्त्री, हेअर ड्रायर तसंच २३ हजार रुपये रोकड असा जवळपास ६५ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काशिनाथ लूटे करत आहेत.

एकदा पांढरे तर दुसऱ्यांदा निळे टी शर्ट
क्रितीका अपार्टमेंटमध्ये शनिवारी झालेल्या चोरीत चोराने पहिल्यांदा एक पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घालून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. शालीकराम यांच्या घरातून वस्तू चोरून तो निघाला होता. मात्र काही वेळानंतर तोच व्यक्ती निळ्या रंगाचे टी शर्ट घालून आला आणि घरातील वस्तू दुचाकीवरून घेऊन पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजमधून याबाबतचा खुलासा झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here