चंद्रपूर: जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. राहत्या घरातच दोघींचा मृत्यू झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना शनिवारी उघडकीस आली असून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

झेलाबाई पोचू चौधरी (आई) आणि माया मारोती पुलगमकर (मुलगी) अशी मृत झालेल्या मायलेकींची नावं आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून चौधरी कुटुंब कोठारी येथे याच घरात वास्तव्याला होतं. दरम्यान काही वर्षांपूर्वी पोचू चौधरी यांचं निधन झालं. त्यानंतर चौधरी कुटुंबातील या दोघी मायलेकीच हयात होत्या.

अलीकडेच मुलगी माया हिचं लग्नही झालं होतं. पण तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिलं. त्यामुळे या दोघी मायलेकींना कोणाचाही आधार उरला नव्हता.

या दोघीही भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. तर मागील काही दिवसांपासून झेलाबाई यांना दीर्घ आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे मुलगीच गावात भिक्षा मागून आईला आणि स्वत:ला जगवत होती. पण मुलगी मायालाही आजारानं गाठलं. आजारपणामुळे तीही भिक्षा मागायला जाऊ शकली नाही. त्यांच्याकडून कुठलंही काम होत नव्हतं आणि पोटात अन्नही नव्हतं. त्यामुळे अखेर शनिवारी अन्नावाचून दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here