गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी रविवारी राज्यपाल आचार्य देव्रत यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी भूपेंद्र पटेल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल नव्हते. ते नाराज झाल्याचं बोललं जात होतं. पण भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वीच आज अहमदाबादमध्ये नितीन पटेल यांची सकाळीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नितीन पटेल यांनी भूपेंद्र पटेल यांची भेट घेतली. या भेटीनंतर नितीन पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण पक्षाच्या निर्णयावर नाराज नसल्याचं नितीन पटेल यांनी सांगितलं.
नितीन पटेलांचा कंठ दाटून आला, म्हणाले…
मी १८ वर्षांचा असताना जनसंघाचं काम केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि पुढेही राहणार. यामुळे कुठलं पद किंवा स्थान मिळो ना मिळो हे याचं आपल्याला महत्त्व नाही. जनतेचं प्रेम आणि सन्मान हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आम्ही सोबत मिळून काम करू. आम्हीही त्यांना मदत केली आहे. यामुळे ते आमचेच बंधू-भगिनी आहेत, असं नितीन पटेल म्हणाले.
भूपेंद्र पटेल आणि नितीन पटेल यांच्यात बराचवेळ सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर नितीन पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नितीन पटेल यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण अचानक भाजपने भूपेंद्र पटेल यांचे नाव घोषित केल्याने त्यांना धक्का बसला. यामुळे ते नाराज असल्याचं रविवारी दिसून आलं. भूपेंद्र पटेल यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना नितीन पटेल यांचा कंठ दाटून आला आणि डोळे डबडबले होते. ते भावुक झाल्याचं दिसून आलं.
पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. यामुळे मी कायम पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि राहील, असं नितीन पटेल म्हणाले. पण तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी राहणार का? असा प्रश्न नितीन पटेल यांना केला गेला. या प्रश्नाचं उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times