याआधीही देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआय निरीक्षक अभिषेक तिवारी यांना न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी दिली होती. देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाचा अहवाल लीक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या लीक झालेल्या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख निर्दोष असल्याची बातमी पसरवली गेली होती. सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी देशमुखांचे वकील डागा यांच्या संपर्कात होते आणि त्यांना सीबीआय अहवालाशी संबंधित माहिती लीक करत होते.
अनिल देशमुख हाजिर हो…
वारंवार समन्स देऊनही अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहत नाहीयेत. यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, आता ईडी आणि सीबीआय मिळून देशमुखांना शोधण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. याआधीही, ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपूर आणि मुंबईच्या १३-१४ ठिकाणी छापे टाकले होते.
अनिल देशमुख कुठे बेपत्ता, ते का गायब आहेत?
अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय आणि ईडीकडून होणाऱ्या तपासाला ते पूर्ण सहकार्य करणार. पण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर त्यांनी तपास यंत्रणांना कधीच सहकार्य केलं नाही. आरोग्य, करोना आणि वयाचा हवाला देत समन्सच्या प्रतिसादात ते कधीही दिसले नाही. कधीकधी वकिलामार्फत उत्तर पाठवण्यात आले.
पण देशमुख यांनी त्यांच्या अटकेविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. यानंतर अनिल देशमुख कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. याचा तपास आता सीबीआय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times