भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मंत्री जयंत पाटील सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत २७०० पानांचे पुरावे असून, मंगळवारी ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्या यांनी जाहीर केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, ‘किरीट सोमय्या यांच्या आरोपात तथ्य नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचे काम मी जाणतो. त्यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचं काम सध्या सुरू आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोप म्हणजे या षड्यंत्राचाच भाग आहे. ते चौकशीत सहकार्य करतीलच. पण सरकारी तपास यंत्रणांनी याची खातरजमा करावी.’
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपांमागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कागलचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे हेच असल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. तसेच समरजितसिंह घाटगे यांचाही पैरा लवकरच फेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times