पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबर रोजी शिवपुत्र सोलापुरे हे वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी पैसे निघाले नसल्याने ते जवळच असलेल्या दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील बॅलन्स चेक करण्यासाठी गेले. तेव्हा तिथं उभ्या असलेल्या तरुणाला त्यांनी एटीएम कार्ड दिलं व पासवर्ड टाकून बॅलेन्स चेक करण्यास सांगितलं. त्यावेळी सदर तरुणाने एटीएमचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर सोलापुरे यांना एटीएम परत करताना हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदली केली. काही वेळातच सोलापुरे यांच्या अकॉऊन्टमधून १ लाख ३१ हजार ५१८ रुपये काढून घेतले. पैसे न काढताच डेबिटचा मेसेज आल्याने सोलापुरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चौकशी करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण औताडे, संदीप नलवडे यांना संशयिताची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमोल सकटे या संशयित तरुणास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात विविध बँकाची ५ डेबिट कार्ड्स, त्यावरील बँक, नंबर व नावे, एसबीआयचे २ कार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे १ कार्ड आणि एस बँकेची २ कार्ड मिळाले. याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने सर्व एटीएम कार्ड एटीएम सेंटरमधून वृद्धांची फसवणूक करून घेतल्याचं सांगितलं.
दरम्यान, वृद्धांची फसवणूक करून चोरलेल्या एटीएम कार्डवरून अमोल सकटे याने लाखो रुपये लंपास केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times