औरंगाबाद: पाकिस्तान आणि घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसेने कंबर कसली असून या घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी थेट बक्षीस योजनाच जाहीर केली आहे. घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ, असं औरंगाबाद मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये तरी घुसखोरांना पकडण्याच्या मोहिमेला वेग येण्याची चिन्हे आहेत.

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर औरंगाबाद मनसेने घुसखोरांचा छडा लावण्यासाठी बक्षीस देण्याची शक्कल लढवली आहे. त्यासाठी मनसेने आकाशवाणी चौकात एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, घुसखोरांची माहिती खरी ठरल्यानंतरच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. अद्याप तरी मनसेच्या या योजनेला यश आलेलं नाही. मात्र, मनसेच्या या बक्षीस योजनेची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यामुळे औरंगाबादमधील घुसखोरांना पकडण्यासाठीची मनसेची ही मोहीम यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मुंबईत घुसखोरांविरोधात मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी राज यांनी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबईत बोरिवली आणि विरारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी काही घुसखोरांची धरपकड केली होती. ठाण्यातही या घुसखोरांना पकडण्यात आलं होतं. पुण्यातही मनसेने काही घुसखोरांना पकडलं होतं. मात्र, हे सर्वजण भारतीयच निघाल्याने मनसे कार्यकर्त्यांसह ८-९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here