विशेष म्हणजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल महापालिकेला जबाबदार न धरता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या आमदारांविरोधात आंदोलन केले जात आहे.
मिरज शहर मिशन हॉस्पिटल चौक या ठिकाणी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि मिरज रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मन्सूर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला मिरजचे आमदार सुरेश खाडे हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी आमदार खाडे यांच्या प्रतिमेवर चिखली फेकला. येत्या आठ दिवसांमध्ये जर मिरज शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजीचे काम झाले नाही तर, आमदारांचे निवासस्थान किंवा कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
सांगली महानगरपालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याचे बहुतांश काम पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महानगरपालिकेला जाब विचारण्याऐवजी याबाबत भाजपच्या आमदारांविरोधात आंदोलन केले जात आहे. यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times