: खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथे अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने हिराबाई दगडू जगताप (वय ७०) या वृद्धेचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी आता वडूज पोलिसांनी संगीता गणपत देशमुख, तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. येलमरवाडी) यांना अटक केली आहे.

गौतम कृष्णा नलवडे यांनी या हत्येप्रकरणी (रा. येलमरवाडी, ता. खटाव) वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास हिराबाई या गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर काही लोकांना पडलेल्या अवस्थेत दिसल्या. बराच वेळ झाला तरी त्या जागच्या हालत नसल्याने स्थानिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता डोक्यातून रक्त वाहत असलेल्या हिराबाई या मृतावस्थेत असल्याचं लक्षात आले. त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती हिराबाई यांचे भाचे गौतम नलवडे यांना कळवली. नलवडे यांनी घटनास्थळी येत पडलेला मृतदेह हा त्यांच्या मावशीचा असल्याचं ओळखल्यानंतर वडूज पोलिसांना कळवले.

घटनेचे गांभीर्य ओळखत सपोनि मालोजीराव देशमुख यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय वडूज येथे पाठवून घटनेबाबत गावात चौकशीला सुरुवात केली. मृत हिराबाई या गावात भिक्षा मागून खात असल्याने त्यांचे कोणासोबत वैर असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे संशयितांचा शोध घेण्याबरोबरच गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

दरम्यान, पोलिसांचे एक पथक तक्रार दाखल करून घेत होते, तर दुसरे पथक येलमरवाडीत तळ ठोकून होते. यावेळी संशयित बागल हा पोलिसांच्या तपासाबाबत संशयास्पद माहिती घेत होता. ही बाब सपोनि देशमुख यांच्या लक्षात आली. त्यानंतर या घटनेचा भांडाफोड झाला. संशयित म्हणून बागल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. तो व त्याची प्रेयसी संगिता यांच्यात अनैतिक संबंध सुरू असताना हिराबाई यांनी भिक्षा मागण्यासाठी वारंवार दरवाजा ठोठावला. त्यामुळे रागाच्या भरात डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याचं त्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी संगीता हिलाही अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्यासह पथकाने केली.

दरम्यान, येलमरवाडीसारख्या शांत गावात खुनाची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस गावात माहिती घेत असतानाच संशयित बागल हा पोलीस तपासाची माहिती अंधारात बसून ऐकत होता. नेमकी हीच गोष्ट सपोनि देशमुख यांच्या नजरेत बसली अन् पोलिसांनी बागल याला ताब्यात घेतले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here