रत्नागिरी: जिल्ह्यातील देवरुख तालुक्यात नदीत पोहण्यासाठी गेलेले ३ जण बुडाल्याची धक्कादायक घडली आहे. यातील एक जण अद्याप बेपत्ता असून २ जणांना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढलं आहे. मात्र यापैकी एकाला मृत घोषित करण्यात आलं असून १५ वर्षीय युवक ग्रामस्थांच्या मदतीने बचावला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना देवरुख नजीकच्या पूर झेपलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहण्यासाठी अशोक झेपले, हर्ष घाटकर आणि संजय घाटकर हे तिघे गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. या दुर्दैवी घटनेत अशोक झेपले याचा मृत्यू झाला आहे, तर हर्ष संजय घाटकर याच्यावर उपचार सुरू आहेत. पोहण्यासाठी गेलेल्यांपैकी संजय सिताराम घाटकर हे बेपत्ता आहेत.

गणेशोत्सवासाठी पूर झेपलेवाडी येथील काही चाकरमानी मुंबईहून गावाकडे आले आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही चाकरमानी व गावातील स्थानिक तरुण असे सुमारे १० जण मिळून सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. हे ठिकाण वस्तीपासून जवळच आहे. गेली चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सप्तलिंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. दहा तरुणांपैकी तिघांनी प्रथम पोहोण्यासाठी नदीपात्रात झेप घेतली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब नदीकिनारी असणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष सरडकर, किशोर जोयशी, जावेद तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता असलेल्या एकाचा शोध सुरू आहे. शोध मोहिमेत ग्रामस्थांबरोबर देवरुख येथील राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते व देवरुख घोरपीवाडीतील पोहण्यात तरबेज तरुण सहभागी झाले होते. येथील संपूर्ण नदी परिसर पिंजून काढण्यात आला. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती.

या दरम्यान संजय घाटकर हे आढळून आले नाहीत. काळोख पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे झेपले वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here