सांगली, तासगाव आणि पंढरपूर मार्केट यार्डात बेदाणा सौदे काढले जातात. यातून दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होते. देशभरातील व्यापारी सौद्यांसाठी सांगलीत येतात. यात परप्रांतीय व्यापाऱ्यांचीही मोठी संख्या असते. सांगली मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याचा हळद, गूळ, बेदाण्याचा मोठा व्यापार आहे.
या व्यापार्याने काही दिवसांपूर्वी हळद, गूळ व बेदाणा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. त्याने हळद व गूळ व्यापाऱ्यांचे पैसे दिले आहे. परंतु बेदाणा व्यापार्यांचे पैसे दिले नाहीत. आठ ते दहा व्यापार्यांचे जवळपास एक कोटी रुपये अडकले आहेत. याबाबत व्यापार्यांनी विचारणा केल्यानंतर सुरुवातीला त्याने चालढकल केली. गेल्या चार दिवसांपासून तो व्यापारी नॉट रिचेबल आहे. तो अचानक गायब झाल्याने पैसे अडकलेले व्यापारी हवालदिल झाले आहेत.
याबाबत काहींनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे मिळावेत, यासाठी बाजार समितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून, त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. संबंधित व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी अद्याप तक्रार आली नसल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटची प्रक्रिया राबवली जाते. यावर्षीही त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times