औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील हे कदाचित महाविकास आघाडीतील एका पक्षात येणार असतील, असा टोला लगावला होता. त्याबाबत कोल्हापुरात पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी प्रतिटोला हाणला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. आपले राजकीय भवितव्य ठरवण्याचा अधिकार हा फक्त भाजप आण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना आहे. कारण मी त्यांच्या संस्कारात वाढलो आहे.’
भाजप-शिवसेना युती होणार?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानानंतर भाजप-शिवसेना युतीच्या चर्चांनी पुन्हा वेग पकडला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी हे सकारात्मक विधान कोणत्या आधारावर केले याची आपण त्यांच्याकडे चौकशी करू. त्यांच्या मनात नेमके काय आहे हे कळायला आपण काय ज्योतिषी नाही,’ असं पाटील म्हणाले.
दरम्यान, कोल्हापुरातील भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा निर्वाळाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना जोरदार विरोध करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ही लोकशाही आहे. लोकशाहीत विरोध करण्याचा सर्वांना अधिकार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times