लहान भावाला दारूचे व्यसन असल्याने त्याला घेऊन मोठा भाऊ त्याचं व्यसन सोडवण्याकरता दिंडोरी इथं गेला होता. दिंडोरीत औषध घेतल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत असताना पांडवलेणी समोरील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख लक्ष्मण जाधव ( ३५ ) व त्यांचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव ( २५ ) हे दोघे राहणार ( मुरंबी,ता. इगतपुरी) त्यांची दुचाकी ( एम एच १५ डी पी ४२१४ ) वरून सोमनाथचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी वणी, दिंडोरी येथे शुक्रवारी सकाळी गेले होते. दरम्यान वणीहून परत येत असताना ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मुंबई आग्रा महामार्गावर पांडवलेणी समोर उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली.
दरम्यान, जाधव बंधूंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा परिवार आहे. घरातील कर्त्या मुलांच्या निधनाने जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर मुरंबी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times