अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर सिभोरा धरणातही एका युवकाचा पाय घसरल्याने मृत्यू झाला. अशातच आता अमरावती शहरातील ब्रिटिशकालीन वडाळी तलावात एकाचा बळी गेला आहे.
नेमकं काय घडलं?
पाणी ओसंडून वाहू लागल्याने वडाळी तलावात अनेक नागरिकांनी आनंद लुटण्यासाठी पोहायला गर्दी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या तलावात विनापरवानगी अल्पवयीन मुलांची गर्दी होत आहे. अशातच शुक्रवारी पाण्यात उडी घेतल्याने तलावाच्या भिंतीचा कोपरा डोक्याला लागल्याने तरुण गंभीर जखमी होऊन पाण्यातच पडून राहिला. एका मुलाने त्याला बाहेर काढून नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
मृतक विजयला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विजय हा खासगी वायरमन म्हणून काम करत होता. तो विवाहित असून त्याला एक ३ वर्षाचा मुलगा आहे. विजयच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times