चांदुर रेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी संचालित महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात १३ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. हे शिबिर टेंभुर्णा येथे घेण्यात आले होते. या शिबिरात देण्यात आलेल्या प्रेमविवाहाबाबतच्या शपथेने वादळ उठले होते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन’ अशा तीव्र भावना माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या संपूर्ण वादाची गंभीर दखल घेत अखेर १३ दिवसांनंतर संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या तीन प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे.
विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या सूचनेवरून संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांनी ही कारवाई केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी. पी. दंदे व राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी एक सदस्यीय चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. महाविद्यालयात कोणतेही नियमबाह्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही संस्थाध्यक्षांनी बजावले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर शिबिरात प्रा. प्रदीप दंदे यांनी मार्गदर्शन केले होते. यात आजच्या युवकांपुढील आव्हाने त्यांनी विशद केली. मुलींवरील वाढते अत्याचार हे एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. हे थांबायला हवे, असे ते म्हणाले. ‘आईबाबांवर विश्वास नाही का? त्या तुमचे लग्न योग्य मुलाशी करून देणार नाही का?’ असे प्रश्न करीत त्यांनी प्रेमविवाह न करण्याचीही शपथ यावेळी विद्यार्थिनींना दिली. त्यासोबत हुंडा न घेण्याचा निर्धारही करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘सध्याच्या रीतीरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून माझ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही व मुलीसाठी हुंडा देणार नाही’, अशी शपथ मुलींना देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times