म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले योजना सुरू झाली असून तीन महिन्यांत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यात सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती घेतली जाईल. या जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ. या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारत भालके यांनी भाग घेतला.

वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय योजना

सामजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय व्यवस्था येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. मोहन मते यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर मुंडे म्हणाले, नागपूर येथील गड्डी गोदाम वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत आंदोलन केले होते. चौकशीअंती या वसतिगृहाचे गृहपाल यांची बदली करण्यात आली. तसेच भोजनपुरवठा करणारा कंत्राटदार देखील बदलण्यात आला. अशा स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून मध्यवर्ती भोजनालय संकल्पना राबविण्यात येईल. त्याचबरोबर वसतिगृहांसदर्भातील सोयी-सुविधा, भोजन व्यवस्था यांचा दर्जा राखण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.

राज्यात सामाजिक न्याय विभागाची मुलींसाठीची जी वसतिगृहे आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यावर्षभरात मुला-मुलींच्या सर्व वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे सामाजिक न्यायमंत्री यांनी स्पष्ट केले.

केंद्र शासनाने जो सकस आहार ठरवून दिलेला आहे, त्यानुसार भोजन दिले जाते. मात्र राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व वसतिगृहांमध्ये समान दर्जाच्या सुविधा, भोजन मिळण्याकरिता धोरण तयार करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here