‘देशात ईडी आणि सीबीआय या विश्वासार्ह संस्थांचा गैरवापर वाढला आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर ७ वेळेस छापे मारुनही काही सापडलं नाही. राजकारणात तत्त्वाची लढाई आणि विरोध असावा. पण, कोणत्याही राजकीय नेत्यात टोकाची कटुता येऊ नये. अन्यथा, माणुसकी संपेल. ईडी, सीबीआयचा वापर ‘चालान’ फाडण्यासाठी सुरू आहे,’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. सुळे यांनी देशातील राजकारण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका याबाबत भाष्य केलं.
‘पाच दशकांच्या प्रवासात आमच्या कुटुंबाने खूप त्रास सहन केला आहे. आमच्यावर अनेक आरोप झाले. ट्रकभर पुरावे आणू असं लोकांनी सांगितलं. पण, सिद्ध काहीच झालं नाही. सध्या राज्यात ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे. या एजन्सींचा वापर ‘चालान’ फाडण्यासारखा केला जात आहे. यात आपण राजकीय सुसंस्कृतपणा गमावला याचं दु:ख वाटतं. एखाद्या नेत्यावर खोटेनाटे आरोप करण्याइतकी असंवेदनशीलता वाढली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार चालण्यासाठी आत्मचिंतन आवश्यक आहे. हा संघर्ष ‘आपण विरुद्ध ते’ असा नाही. राजकारणात तत्वाची लढाई आणि विरोध असावा. पण, टोकाची कटुता वाढली तर माणुसकी संपेल,’ असं सुळे म्हणाल्या.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सात वेळेस छापे टाकण्यात आले. एकाच व्यक्तीच्या घरावर सात वेळेस कारवाई कशी होऊ शकते? अशा कारवायांमुळे केंद्रीय संस्थांनी लौकीक गमावला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमे बदलत आहेत आणि कधी पाहिलं नाही, असं वातावरण अनुभवत आहेत. संपादकांच्या बदल्या आणि वृत्तसंस्थांवर छापे पडत आहेत. वडील शरद पवार यांनी मला वृत्तपत्र वाचनाची सवय लावली. वृत्तपत्रे वाचल्याशिवाय आणि शाई हाताला लागल्याशिवाय सकाळ झाली असं वाटत नाही. वृत्तपत्रातील लेखांवर चर्चा करायला आवडते. वृत्तपत्र वाचन हा संस्काराचा एक भाग आहे. आता डिजिटल वाचनावर नवी पिढी भर देत आहे. यु-ट्यूब पत्रकारितेचा प्रकार वाढीस लागला आहे. राजकारणी असल्यामुळे चढ्या आवाजातील टीव्हीच्या बातम्या आवडो न आवडो तरी पहाव्या लागतात, असंही सुळे म्हणाल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times