: करोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मास्कचा वापर करण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे. तसंच पोलिसांना रस्त्यावर उतरून कारवाईचा आदेश देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळपासूनच कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेसोबतच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे निर्देश डॉ. गमे यांनी आज करोना आढावा बैठकीत दिले. संभाव्य तिसरी लाट आली तर तशी तयारी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हॉस्पिटलमधील बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला.

संसर्ग नियंत्रणावर जास्त भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासाठी एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील तीस व्यक्तींची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला. दहा टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या परिसरात कडक लॉकडाऊन करणे, आठवडी बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना वस्तू देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, करोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, गृहविलगीकरण बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढवणे अशा उपाययोजना अंमलात आणण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

दरम्यान, अहमदनगर शहरातील नव्या रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी संगमनेर, पारनेर आणि अधूनमधून श्रीगोंदा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून पाच ते साडेपाच हजारांच्या दरम्यान आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here