ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. हिंदू सेनेचे काही कार्यकर्ते खासदार ओवैसींच्या अशोक रोडवरील बंगला क्रमांक ३४ वर पोहोचले होते. तिथे, कार्यकर्त्यांनी ओवैसींविरोधात घोषणा दिल्या आणि नंतर तोडफोड सुरू केली. त्यांनी गेटवरील नेम प्लेट्स आणि दिवे तोडले. घराच्या खिडक्यांचेही नुकसान केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मात्र, या घटनेवेळी ओवैसी हे निवासस्थानी नव्हते. या घटनेची ही माहिती संसद मार्ग पोलीस ठाण्याला मिळाली आणि आता हिंदू सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली जात आहे. ओवैसी आणि त्यांचे भाऊ हिंदू आणि हिंदू देव – देवतांविरुद्ध सतत वक्तव्य करत असतात. त्यांनी सभांमध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी प्रक्षोभक आणि हिंदूविरोधी वक्तव्य करू नयेत, असं आवाहन हिंदू सेनेचे प्रदेशाध्यक्ष ललित कुमार यांनी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत केलं आहे.
भ्याड हल्ल्यांना भीत नाहीः ओवैसी
काही गुंडांनी आज आपल्या दिल्लीतील निवासस्थावर हल्ला केला. असे भ्याड हल्ले ते करतच असतात. कारण ते कायम झुंडीने फिरतात. मी घरी नसताना हा हल्ला झाला. गुडांच्या हातात कुऱ्हाडी आणि लाठ्याकाठ्या होत्या. गुडांनी नेम प्लेट तोडली. ४० वर्षांपासून काम करणाऱ्या राजूला मारहाण केली. धार्मिक घोषणा दिल्या गेल्या. जवळपास १३ जणांनी हल्ला केला. ६ जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
आपल्या घरावर तिसऱ्यांदा हल्ला केला गेला आहे. यापूर्वी हल्ला झाला त्यावेळी राजनाथ सिंह हे आपले शेजारी होते. निवडणूक आयोग बाजूलाच आहे. पंतप्रधानांचं निवासस्थान फक्त ८ मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीही आपल्या निवासस्थानाला लक्ष्य केलं जात आहे. याबद्दल पोलिसांना अनेकदा सांगितलं. खासदारांचचं घर सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय? असा सवाल ओवैसींनी केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times