गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी मंगळवारी तातडीने बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सदर मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचा सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसंच नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, प्रशिक्षण केंद्र यांचं काम नीट सुरू आहे अथवा नाही याबाबत आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, पोलिसांची या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर लक्ष असल्याचे यावेळी गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे. सुरजागड हा छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग असला, तरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times