मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं सांगत विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना करण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला खरमरीत उत्तर दिल्यानंतर आता काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत भाजपशासित राज्यातील व फडणवीस सरकारच्या काळातील महिला अत्याचाराची आकडेवारीच जाहीर केली आहे. ()

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात सविस्तर ट्वीट केलं आहे. ‘महिला अत्याचाराच्या प्रश्नावर विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावावं ही भाजपची मागणी आहे. ती उचलून धरत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, असा आरोप सावंत यांनी केला आहे. त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील महिलांचा विचार करत संसदेचे ४ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे, ती योग्यच आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. त्यासाठी सावंत यांनी भाजपशासित राज्यांतील गुन्ह्यांची आकडेवारीही दिली आहे.

वाचा:

‘NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार, महिला अत्याचारांमध्ये भाजपशासित उत्तर प्रदेश पुन्हा आघाडीवर आहे. आसाम, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या भाजपच्या राज्यातही महिला अत्याचाराचे मोठे प्रमाण आहे. आसाममध्ये सर्वाधिक प्रति लक्ष १५४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. गँगरेप, मर्डरच्या घटनांमध्येही उत्तर प्रदेश पुढे आहे. त्यानंतर भाजपशासित मध्य प्रदेश व आसाम येतात,’ याकडं सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.

‘भाजपशासित राज्यात महिलांवर बेसुमार अत्याचार होत असतानाही राज्यातील भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे की फडणवीसांच्या काळात गँगरेप व खुनाच्या ४७ घटना घडल्याने २०१९ ला महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक होता. फडणवीसांच्या तथाकथित रामराज्यात २०१५ साली ३१,२१६ घटना, २०१६ साली ३१,३८८ घटना, २०१७ साली ३१,९७८ घटना, २०१८ साली ३५,४९७ घटना तर २०१९ साली ३७,१४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० ला त्यात घट होऊन महिला अत्याचारांची संख्या ३१,९५४ झाली. तर सामूहिक बलात्कार व खुनाच्या २० घटना घडल्या. फडणवीस सरकारच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. हे आकडे पाहता उद्धव ठाकरे यांनी देशातील विशेषतः भाजपच्या राज्यांतील महिला अत्याचारांवर चर्चेसाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला संघ विचारधारेतून महिला विरोधी बनलेल्या भाजपने पाठिंबा द्यावा, असे सावंत म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here