खवल्यांचा व्यवहार ठरला होता तो व्यवहार पोलिसांनी धाड टाकुन उधळून लावला आहे. मात्र, त्याची रक्कम व कोणाजवळ व्यवहार ठरला हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी न्यायालयाने संशयित बळीराम उतेकर याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. उतेकर हा चिकन व्यवसायिक असून त्याचे चिकन सेंटर असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एक संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा संशयित आरोपी कारवाई दरम्यान दुचाकीवरून पळून गेला आहे.
महाडवरून हे खवले दापोलीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील महाड नागाव फौजदारवाडी येथील बळीराम नारायण उतेकर, वय ४२ वर्षे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दुचाकीवरून पळलेला अन्य एक संशयित आरोपी तुकाराम नारायण शिंदे नेरुळनगर, खैरोली, ता. रोहा, जि. रायगड याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित आरोपीलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
वन्य जीव (संरक्षण) कायदा १९७२ मधील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुशील यशवंत मोहिते यांनी फिर्याद दाखल केली आहे. यातील संशयित आरोपी बळीराम उतेकर हा त्याचेसोबत असणारा संशयित आरोपी तुकाराम नारायण शिंदे याची युनिकॉन होंडा कंपनीची मोटर सायकल गाडीवरून ही तस्करी करित असताना दापोली पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
खवले मांजराची खवले बेकायदेशीरपणे स्वतःचे ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतुक होत असल्याची खबर दापोली पोलिसांना मिळाली होती. पोलीस हवालदार संदीप गुजर, अशोक गायकवाड, सुशील मोहिते, दिंडे या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी अधिक तपास गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास पडयाळ हे करीत आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी हे खवले कोठून आणण्यात आले होते? कोणाला विकण्यात येणार होते? आदी प्रश्नांचे गूढ पुढील तपासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times