: न्यायालयात कौटुंबीक वाद सुरू असताना पत्नीचे फोटो आक्षेपार्ह मजकुरासह सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महिलेच्या पतीला ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विश्रांतीनगर भागातून ताब्यात घेतलं आहे.

ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात एका महिलेने १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचं लग्न झालेलं असून तिला दोन मुले आहेत. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. यामुळे पतीशी विभक्त होऊन ही महिला माहेरी आली होती. सध्या न्यायालयात कायदेशीर फारकतीचं प्रकरण प्रलंबीत आहे. सदर प्रकरण कोर्टात असताना, तिचा पती कुटुंबीयांसोबत काढलेले खासगी फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मजकुरासह प्रसारित करत होता. तसंच सदर फोटो हे महिलेच्या नातेवाईकांनाही पाठवत होता, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अंमलदार कैलास कामठे, संदिप वरपे, रविंद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाये, लखन पाचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांनी या प्रकरणाचा तपास करून सोशल मीडियावर पाठवल्या जाणाऱ्या अशा फोटोंची तांत्रिक माहिती काढली. या माहितीवरून सदर विवाहितेच्या पतीला विश्रांतीनगर भागातून अटक करण्यात आली आहे. विवाहितेची बदनामी करणाऱ्या पतीने आधी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी विवाहितेच्या पतीचा मोबाईल तपासला असता, सदर फोटो त्यानेच पाठवल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी आरोपीला मोबाईलसह ताब्यात घेण्यात आलं आहे.

अद्दल घडवण्यासाठी केले कृत्य
सदर कृत्याबाबत आरोपीला पोलिसांनी विचारणा केली असता, पत्नीने त्याच्यासोबतच संसार करावा व आपल्या घरी नांदायला यावे, म्हणून तिला व तिच्या नातेवाईकांना अद्दल घडवण्यासाठी तिचे खासगी फोटो आक्षेपार्ह मजकुरासह सोशल मीडियावर शेअर केल्याचं त्याने सांगितलं.

‘शांत राहू नका, तक्रार द्या’
‘समाजात वावरताना अनेक मुली किंवा महिलांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावरून महिला व मुलींना अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल, तर त्यांनी निर्भिडपणे तक्रार करावी. लोक काय म्हणतील? या विचाराने शांत राहू नका. अशी कुठलीही तक्रार असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करा,’ असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here