या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्याच्या भैरवी वासुदेव बागूल यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पोलीस वाहनचालक भरतीप्रकरणात डमी उमेदवार बसवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश भाऊलाल राठोड (२२, रा. बेगानाईक तांडा, पोस्ट आडगाव, ता. औरंगाबाद), पूजा रामदास दिवेकर (२४, रा. टीव्ही सेंटर, एन-११, एफ-१५७) व भागवत दादाराव बरडे (२१, रा. फत्तेपूर, ता. भोकरदन, जि. जालना) यांना यापूर्वी अटक करुन त्यांची रवानगी आधी पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात चौथा आरोपी सचिन गोकुळ गोमलाडू (राजपूत) (२२, रा. काऱ्होळ, गोलटगाव, ता. जि. औरंगाबाद) याला मंगळवारी रात्री अटक करण्यात येऊन त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, डमी उमेदवार बसवण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असून, यातील अनेक आरोपींना अटक करणे बाकी आहे, या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले मोबाईल, माईक स्पाय असे विविध साहित्य आरोपी सचिन याने खरेदी केले होते व त्याबाबत आरोपीकडे चौकशी करणे बाकी आहे, आरोपीने डमी उमेदवार बसवून किती व कुठेकुठे गुन्हे केले व कोणकोणत्या परीक्षा दिल्या, कुणाकुणाला आमीष दाखवून डमी उमेदवार म्हणून परीक्षेस बसवले आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, मुख्य आरोप सचिन गोमलाडू याच्या चौकशीतून या रॅकेटबाबत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times