म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘बॉम्बे’ हा दुर्मिळ रक्तगट असताना, नागपूरमधील डॉ. हेगडेवार रक्तपेढीच्या माध्यमातून पॅराबॉम्बे हा रक्तगट असलेल्या दोन व्यक्ती आढळून आल्या आहेत. हा रक्तगटदेखील अतिशय दुर्मिळ असून, देशात अद्याप या रक्तगटासंदर्भात मोठ्या संख्येने नोंद झालेली नाही. या रक्तगटाचे नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठी मुंबईतील एनआयएच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजीकडे पाठवण्यात आले होते. लाळ व रक्तनमुन्याचा अभ्यास केल्यानंतर हा रक्तगट पॅराबॉम्बे रक्तगट असल्याचे निष्पन्न झाले.

रक्ताच्या निर्मितीसाठी शरीरातील एच अँटिजेनची गरज असते. या रक्तगटामध्ये हा अँटिजेन नसतो वा त्याची तूट असते. त्यामुळे त्या रक्तगटाला सर्वसाधारण चाचण्यांमधून नाव देता येत नाही. अनेकदा या रक्तगटाचा समावेश हा ओ मध्ये करण्यात येतो. मात्र, ते योग्य नाही. रक्तगट ओळखण्यासाठी त्याची चाचणी ही नोंदणीकृत रक्तपेढीमध्ये केल्यास त्याचे नेमके निदान होण्यास मदत होते हे देखील यातून दिसून आले आहे.

रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा सोनी यांनी अशा प्रकारच्या दुर्मिळ रक्तगटांची नोंद ठेवली असता, आपत्कालीन स्थितीमध्ये हे रक्त या रक्तगटाच्या गरजू रुग्णांना उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास ‘मटा’कडे व्यक्त केला. हा रक्तगट नेमका कसा आढळून आला हे सांगताना त्यांनी अधिक माहिती दिली. नागपूर येथे रक्तदान केलेल्या एका दात्याने त्यांच्या मुलाचा रक्तगट असल्याचे बोलण्याच्या ओघात डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी या रक्तदात्यासोबत त्यांच्या मुलाच्याही रक्ताची चाचणी केली असता, तो रक्तगट बॉम्बे नसून पॅराबॉम्बे रक्तगट असल्याची शक्यता वर्तवली. अधिक चाचणीसाठी त्यांनी रक्त व लाळेचे नमुने मुंबईला पाठवले. लाळेमध्येही या प्रकारच्या रक्तगटाची निश्चित करणाऱ्या काही रक्तघटकांची उपलब्धता असते. त्यामुळेही हे नमुनेही पाठवण्यात येतात. अशा प्रकारच्या दुर्मिळ रक्तगटाची नोंद ही वेगळ्या डिरेक्टरीमध्ये केली जाते. हा रक्तगट असलेल्या अन्य गरजूंना रक्ताची गरज भासलीच, तर या व्यक्तींचे रक्त त्यांना मिळू शकते. असा रक्तगट असलेल्या दात्यांना मात्र रक्ताची गरज भासल्यास त्यांना काळजीपूर्वक रक्त घ्यावे लागते. त्यांनी ओ रक्तगट समजून रक्त घेतले, तर शरीरातील तांबड्या पेशींचे कार्य विस्कळीत होऊन त्यांचे विघटनही होण्याची शक्यता असते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here