पुणे : करोनाच्या या जीवघेण्या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले, संसार उद्ध्वस्त झाले, लेकरा-बाळांचा मृत्यू झाला. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारपणामुळे मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाल्याने नैराश्य आलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील नांदेड फाटा येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदेड फाटा येथे राहणारे संजीव कदम (वय ४०) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या अशा जाण्यामुळे कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी कदम यांचा एक मुलगा आणि मुलीचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे कदम यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कदम यांचा मुलगा १४ वर्षांचा होता, तर मुलगी ही १० वर्षांची होती. दोघांचेही काही दिवसांपूर्वी थोड्या दिवसांच्या अंतराने निधन झाले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times