मुंबई: आर्थिक नुकसान आणि बळींच्या आकड्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या दंगलीची (Delhi Violence) भयानकता पुढं येऊ लागल्यानं राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं याच मुद्द्यावरून भाजपला पुन्हा एकदा घेरलं आहे. ‘वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत, त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री () कुठेच दिसत नाहीत. ते कुठे आहेत,’ असा खडा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

वाचा:

सीएए समर्थक व विरोधकांमध्ये उसळलेली दंगल आता कुठे शमली आहे. मात्र, या दंगलीत ३८ बळी गेले आहेत व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते? असा प्रश्न अग्रलेखातून करण्यात आला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> राष्ट्रवादाचा उन्माद आणि धर्मांधतेचा मस्तवालपणा या दोन्ही प्रवृत्ती देशाला तीनशे वर्षे मागे ढकलत आहेत. भडकाऊ भाषणे हेच राजकारणाचे भांडवल झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळत आहे, पण भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात आहे.

>> केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते व विरोधी बाकांवर भारतीय जनता पक्षाचे महामंडळ असते तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. पण आता तसे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे व विरोधी पक्ष कमजोर आहे.

>> देशाच्या राजधानीत ३८ बळी गेले. त्यात पोलीसही आहेत व केंद्राचे अर्धे मंत्रिमंडळ त्यावेळी अहमदाबादेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फक्त ‘नमस्ते साहेब!’ असे करण्यासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री व त्यांचे सहकारी अहमदाबादेत होते तेव्हा गृहखात्याचे एक गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या दंगलीत झाली.

वाचा:

>> तब्बल तीन दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चौथ्या दिवशी त्यांच्या सहकाऱयांसह दिल्लीच्या रस्त्यांवर लोकांशी संवाद साधताना दिसले. त्याने काय होणार? जे व्हायचे ते नुकसान आधीच होऊन गेले आहे.

>> प्रश्न असा आहे की, या काळात आपल्या गृहमंत्र्यांचे दर्शन का झाले नाही? देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आहेत, पण ते दिसले नाहीत याचे आश्चर्य वाटते. विधानसभा निवडणुकीत शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते व या प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता, पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत. विरोधी पक्षाने दिल्लीतील दंगलीचा प्रश्न उपस्थित केलाच तर त्या सगळ्यांना देशद्रोही ठरवले जाईल काय? हाच प्रश्न आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here