अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्यभरात तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येत आहेत. या पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या प्रवेशपत्रात प्रचंड त्रुटी असून अनेक विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश तर काहींना नोएडा येथील दर्शवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण २ हजार ७४० एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. गट ‘ड’साठी ३ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. एकूण जवळपास ६ हजार २०० जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.

मागील दोन वर्षापासून राज्यात करोना प्रादुर्भाव असल्याने स्पर्धा परीक्षा मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा बंद होत्या. दोन वर्षानंतर आता ही पदभरती सुरू झाली आहे. मात्र यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे.

या परीक्षा देण्यासाठी जे प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहेत, त्या प्रवेश पत्रांवर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना नोएडाचे परीक्षा केंद्र दाखवण्यात आलं आहे. तसंच काही उमेदवारांना उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. आरोग्य विभाग एवढ्यावरच थांबला नाही तर प्रवेश पत्रांवर अनेक विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नावही बदलण्यात आलं आहे. याच प्रवेश पत्रांवर अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.

‘आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून परीक्षा दोन दिवसावर आली असताना अशा प्रकारे गोंधळ उडाल्याने आम्ही चिंतेत आहोत. यावर तात्काळ उपाय योजना करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,’ अशी प्रतिक्रिया मंगेश कुकडे या परीक्षार्थीने दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here