अहमदनगर: साखर कारखान्यांच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा घेऊन फडात उतरलेले भाजपचे नेते माजी खासदार यांचा कोल्हापूर दौरा गाजला. पारनेरमध्ये मात्र त्यांच्या वाट्याला कामगार, शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देण्याची वेळ आली. ज्या कारणासाठी ते आले होते, त्या कारखान्याच्या तक्रारीबद्दल ठोस काहीच न सांगता महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करण्यावरच त्यांनी भर दिला. तर भाजप नेत्यांच्या कारखान्यांसंबंधीच्या तक्रारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी बगलच दिली. एवढेच नव्हे तर जवळचा रस्ता असूनही त्यांनी राळेगणसिद्धी गावाला वळसा घालून जाणारा रस्ता निवडला. (bjp leader faces ignominy in parner in district)

कोल्हापूरच्या वाटेवर प्रशासनाने कराडमध्ये अडविले, त्यावेळीच सोमय्या यांनी पारनेर कारखान्यावर येण्याची घोषणा केली होती. त्यामुळे येथेही पुन्हा नाट्य घडते की काय, याकडे लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रसने थेट विरोध न करण्याची भूमिका घेतली. तीच भूमिका सोमय्या यांच्या दौऱ्यातील हवा काढणारी ठरल्याचे दिसून आले. सोमय्या यांना पारनेरमध्ये अनेक विरोधाभासांना सामोरे जावे लागले. त्यामुळे भूमिका घेताना आणि प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची मोठी अडचण झाल्याचे पहायला मिळाले.

क्लिक करा आणि वाचा-
कारखान्यावर आल्यावर प्रथम त्यांना कामगार आणि शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. तकारी किंवा चौकशीमुळे कारखाना बंद पडू नये, अशी कामगार आणि शेतकऱ्यांची भूमिका होती. त्यामुळे सोमय्या यांनाही त्यांच्याशी सहमत होत चौकशीचा यावर परिणाम होणार नाही, होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडावी लागली. शिवाय या कारखान्याच्या विक्री व्यवहारासंबंधी आतापर्यंत जी माहिती पुढे आली होती, तीच त्यांनी दिली. गैरव्यवहार झाला की नाही याबद्दलही स्पष्ट भाष्य न करता चौकशीत सत्य समोर येईल, असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट टार्गेट केले. पारनेरमध्ये मात्र असे कोणाही नेत्याचे त्यांनी नाव घेतले नाही. केवळ संशयास्पद व्यवहार वाटत असल्याचेच ते सांगत होते.

क्लिक करा आणि वाचा-
त्यांची आणखी एक अडचण झाली ती भाजप नेत्यांच्या कारखान्यांसंबधीच्या प्रश्नावर. नगर जिल्ह्यात पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या आणि आता भाजपमध्ये आलेल्या नेत्याच्या कारखान्याबद्दलही तक्रारी होत्या. त्यासंबंधी काय भूमिका घेणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर थेट उत्तर न देता, जेथून तक्रार येते, त्यात मी लक्ष घालतो. पारनेर कारखान्यावरही येथील कारखाना बचाव कृती समितीचे शिष्टमंडळ मला भेटले, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचा फोन आला. त्यामुळे येथे आल्याचे त्यांनी सांगून मूळ प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले.

क्लिक करा आणि वाचा-
अण्णा हजारे यांच्यासंबंधीच्या प्रश्नावरही असेच उत्तर त्यांनी दिले. हजारे यांनी राज्य सहकारी बँक आणि साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या अनियमिततचे प्रकरण बाहेर काढून न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे तुम्ही हजारे यांना भेटणार का? त्यांना पाठिंबा देणार का, असे विचारले असता त्यांनी यावरही थेट उत्तर देणे टाळले. पारनेरहून शिरूरला जाण्यासाठी राळेगणसिद्धीहून जाणारा जवळचा रस्ता आहे. मात्र, त्यांनी त्या रस्त्याने जाणे टाळून सुपे मार्गे दूरचा रस्ता निवडला. यावरून हजारे यांना टाळण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे दिसून आले. कामगारांशी चर्चा करतानाही त्यांनी फारसे कोणाला बोलू दिले नाही. थेट प्रश्न करणाऱ्यांना प्रतिप्रश्न केले.

पत्रकार परिषदेत मात्र कोल्हापूरमधील घटना घडामोडी, पुन्हा कोल्हापूरला जाणारच यासोबतच आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. ज्या मूळ कारणासाठी ते आले होते, त्या पारनेर कारखान्याच्या तकारीसंबंधी ठोस असे काहीच न मिळाल्याने कारखान्याशी संबंधित लोकांची निराशाच झाली. कारखान्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यासाठी आलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही ते फारसे महत्व देत नसल्याचेही दिसून येत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here