याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या लातूर जिल्ह्यात सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतात आठ जण सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. दुपारचे जेवण करण्यासाठी सर्वजण बसले असताना दुपारी ३.३० च्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि शशिकला सिताराम गवळी (५५ वर्ष) यांच्या अंगावरही वीज कोसळली. या दुर्घटनेत शशिकला गवळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सिताराम बाबू गवळी(६०), दैवशाला गोरख कटकटे(४०), शंकर सिताराम गवळी(२५) हे तिघेजण जखमी झाले.
जखमी व्यक्तींपैकी दोघांना उपचारासाठी औसा येथे हलवण्यात आलं आहे. विजेचा प्रचंड आवाज झाल्याने इतर काही व्यक्ती भयभीत झाले असून अद्यापही काही जणांच्या अंगाचा थरकाप होत असल्याचं राजेंद्र लक्ष्मण गवळी या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
मृत शशिकला सिताराम गवळी यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा आहे. सदर घटनेचा पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर भादा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वीज कोसळून शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याने भादा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times