नाशिक : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या एंजल मोरे या युवतीने, मॅरेथॉन जलतरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ हा बहुमान प्राप्त केला आहे. तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी दोन हात केल्यानंतर, १५ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी इंग्लिश खाडी पार करून तिने हे असामान्य यश मिळवले.

एंजल मूळच्या नाशिक येथील मोरे परिवारातील आहे. ज्येष्ठ संगणक अभियंता तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक हेमंत आणि अर्चना मोरे यांची ती कन्या असून, व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक झाले आहे.

एंजलचा या मोहिमेतील अत्यंत खडतर जलप्रवास इंग्लंड ते फ्रान्स असा होता. खाडी ओलांडण्याचे हे अंतर, म्हणजेच चॅनल क्रॉसिंग २८.१ मैल (४५.१ कि.मी.) इतके प्रदीर्घ होते. एंजलसह अन्य आठ स्वतंत्र एकल जलतरणपटू आणि दोन रिले संघ ग्रीनीच मध्यवर्ती वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता मोहिमेवर निघाले. सोसाट्याचा वारा आणि पाण्याच्या प्रचंड वेगाने त्यांच्या पुढे आव्हान उभे केले. परिणामी यापैकी पाच माघारी फिरले. मात्र एंजलने अतिशय धीरोदात्तपणे आणि धाडसाने या आव्हानाचा सामना करून अतुलनीय यश मिळवले.

मॅरेथॉन जलतरणाचा ‘वर्ल्ड ट्रिपल क्राऊन’ मिळवण्यासाठी इंग्लिश खाडीबरोबरच (२१ मैल, ३३ कि.मी.) वीस पूल पार करावे लागणारी मॅनहॅटन जलतरण मोहीम (२८.५ मैल, ४५.९ कि.मी.) फत्ते करावी लागते. एंजलने ती १७ ऑगस्ट २०१९ रोजी ९ तास १ मिनिट अशा वेळेत पूर्ण केली होती. तत्पूर्वी याचा अन्य तिसरा निकष असणारी कॅटालिना खाडीदेखील (२० मैल, ३२.३ कि.मी.) २५ जून २०१८ रोजी १४ तास २२ मिनिटे या कालावधीत पार केली होती. एंजल पाच वर्षांची असल्यापासून पोहते. ती आता अठरा वर्षांची असून ‘यूसीएलए’ची विद्यार्थिनी आहे.

या मोहिमेतील तिचे सपोर्ट बोट पायलट स्टुअर्ट ग्लीसन म्हणाले की, त्यांना एंजलच्या यशाची पूर्णपणे खात्री होती. यावेळी सोबत सहायक बोटीवर असलेल्या एंजलच्या आई अर्चना म्हणाल्या की, मागे लोटणाऱ्या लाटा आणि जोरदार प्रवाहाशी झुंज देणारी एंजल जणु एखाद्या मासोळीसारखी पाणी कापत पुढे जात होती. हे सारेच अद्भुत, अवर्णनीय होते.

मॅरेथॉन जलतरणाचे मानदंड कडक आहेत. ओला पेहराव तसेच कोणतीही स्थिर वस्तू, बोट किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यास स्पर्धक अपात्र ठरतात. या पार्श्वभूमीवर एंजलचे यश लक्षवेधी आहे. सॅनफ्रान्सिस्कोत जन्मलेली आणि वाढलेली एंजल नऊ वर्षांची असल्यापासून ५२ वेळा अल्काट्राझ बेटावरून किनाऱ्यावर पोहली आहे. स्वीडन, चिली, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही तिने जलतरण केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here