: दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच मित्रांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी भरदुपारी एकच्या सुमारास गारखेडा परिसरात घडली. या घटनेत दिनेश रुस्तमराव देशमुख (३१, रा. मोतीनगर) हा गंभीररित्या होरपळला आहे.

खासगी वाहन चालक दिनेश हा १९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी घरातील काम आटोपून बाहेर पडला. तेवढ्यात साडेदहाच्या सुमारास मित्र किरण बालाजी गाडगीडे हा घराजवळ आला. त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले. तेथे दारु सेवन केल्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटवर आले. तेथे गप्पा मारत असतानाच दुपारी एकच्या सुमारास नितीन सोनवणे व भागवत गायकवाड तेथे आले. त्यापैकी नितीनने दुचाकीसाठी थोडे पेट्रोल दे, अशी मागणी केली. त्याला दिनेशने नकार दिला. पण किरणच्या सांगण्यावरुन दिनेशने त्याला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितले.

नितीनने पेट्रोल काढल्यानंतर थोड्या पेट्रोलमध्ये काय होणार म्हणत आणखी पेट्रोलची मागणी केली. तेव्हा मात्र दिनेशने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतने चिथावणी देत नितीनला त्याच्या अंगावर पेट्रोल फेकण्यास परावृत्त केले. नितीनने पेट्रोल फेकताच दुसरीकडून किरणने माचीसची पेटलेली काडी त्याच्या अंगावर फेकली. त्यामुळे या आगीत दिनेश २५ टक्के भाजला. त्याला कुटुंबियांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात होताच पोलिसांनी दिनेशचा जवाब नोंदवला. त्याच्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here