शारजा : मुंबई इंडियन्सच्या संघावर आज सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग मुंबई इंडिन्सला करता आला नाही आणि त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. आरसीबीकडून यावेळी ग्लेन मॅक्सवेलने दमदार अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करत असताना मॅक्सवेलने ५६ धावा फटकावल्या, त्याचबरोबर गोलंदाजी करताना दोन विकेट्स मिळवल्या. आरसीबीच्या हर्षल पटेलने यावेळी हॅट्रिक साजरी केली. या सत्रातील ही पहिलाच हॅट्रिक ठरली. या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मुंबई इंडियन्सला १११ धावांवर ऑलआऊट केले आणि ५४ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह आरसीबीचे १२ गुण झाले आहेत.

आरसीबीच्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने धडाकेबाज सुरुवात केली होती. रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी ५७ धावांची सलामी दिली होती. पण डीकॉकनंतर रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव गडगडायला सुरुवात झाली. रोहितने यावेळी २८ चेंडूंत ४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.पण तो बाद झाल्यावर मात्र मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजा संघाला सावरता आले नाही.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत इतिहास रचला आहे. कारण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाचा पाया रचल्याचे पाहायला मिळाले. कारण कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून देताना तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५१ धावांची दमदार खेळी साकारली, कोहलीला यावेळी ग्लेन मॅक्सवेलने चांगली साथ दिली. मॅक्सवेलने दणकेबाज फलंदाजी करताना ३७ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावा फटकावल्या. त्यामुळेच यावेळी आरसीबीला १६५ धावा करता आल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here