: मुंबई-अहमदाबाद या दरम्यान देशातील पहिल्या ‘बुलेट’ प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच, ‘नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून मुंबई-नागपूर या दुसऱ्या आणि मुंबई-हैदराबाद या तिसऱ्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचे नियोजन सुरू झाले आहे. मुंबई-हैदराबाद या ६५० किमी अंतराच्या तिसऱ्या बुलेट प्रकल्पासाठी ‘एनएचएसआरसीएल’कडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा भाग म्हणून पर्यावरण आणि सामाजिक परिणाम मूल्यांकन अभ्यास हाती घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातून ही बुलेट धावणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील स्थानिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी प्राधिकरणाकडून आज, सोमवार २७ सप्टेंबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये विशेष सल्लामसलतीचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासमोरील सर्व अडथळे दूर करून भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. दुसरीकडे मुंबई-नागपूर या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या दुसऱ्या प्रकल्पाचे नियोजन सुरू आहे. या संदर्भातील जनसुनावणी नुकतीच ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई-हैदराबाद यादरम्यान तिसऱ्या बुलेट प्रकल्पाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्याला जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असला, तरी राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीनेही वेगवान प्रवासाची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. मुंबई, ठाणे, कामशेत (लोणावळा), पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा आणि हैदराबाद या शहरांना या बुलेट ट्रेनमुळे जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लाइट डिटेक्शन अँड रेंजिग सर्व्हे अर्थात (लिडार) सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे काम सुरू असतानाच ‘एनएचएसआरसीएल’च्या माध्यमातून प्रकल्पाचा एक भाग म्हणून पर्यावरण आणि सामाजिक परिणाम मूल्यांकन अभ्यास हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती प्रकल्पबाधित आणि जिल्ह्यातील भागधारकांना देण्यासाठी प्राधिकरणाकडून जाहीर सार्वजनिक सल्लामसलत आयोजित केली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे पर्यावरण आणि सामाजिक प्रभावाच्या मूल्यांकनासाठी शहरातील नागरिकांनी या सल्लामसलतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

आणखी एका प्रकल्पाची भर

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे, मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, विरार-आलिबाग कॉरिडोअर, नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, महामार्गांचे रुंदीकरण, नवीन धरणे अशा निरनिराळ्या प्रकल्पांचा ठाणे शहरात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-हैदराबाद बुलेट प्रकल्पाच्या निमित्ताने आणखी एका प्रकल्पाची यामध्ये भर पडली आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असून त्याचा निश्चित मोबदलाही प्रकल्पबाधितांना दिला जातो. राज्याच्या वेगवान दळणवळणासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने या प्रकल्पासंदर्भात ठाणेकर नागरिक नेमकी काय भूमिका घेतात, हे या सल्लामसलतीमधून स्पष्ट होऊ शकणार आहे.

शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पाच्या निमित्ताने जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले असले, तरी पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने सामान्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही. मुंबई-नागपूर बुलेट प्रकल्पाच्या सुनावणीदरम्यान नागरिकांच्या अनुपस्थितीतच केवळ जनसुनावणी पूर्ण केल्याचा देखावा करण्यात आला होता. तसा प्रकार या सुनावणीमध्ये होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप या नव्या प्रकल्पाची पुरेशी माहिती नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे.

– गिरीश साळगांवकर, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here