: शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. बँकेचे अध्यक्ष यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणारी ‘केडीसीसी’ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांचा नफा हे उद्दिष्ठ ठेवले असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज द्यावे, म्हणून मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार तीन लाखाची कर्जमर्यादा पाच लाख करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी वार्षिक सभेत अधिकृत घोषणा केली.

मुश्रीफ म्हणाले की,‘ प्रशासकाची कारकीर्द जाऊन संचालक मंडळाने सहा वर्षापूर्वी बँकेची सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा बँक तोट्यात होती. संचालक मंडळाच्या कालावधीत गेल्या सहा वर्षात बँकेने उत्तुंग कामगिरी केली आहे. प्रशासक काळातील १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढून बँकेने १४५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. सध्या बँकेच्या ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये बँकेने ९००० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे. बँकेने आयकर विभागाच्या कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी वर्गवारीत सर्वात जास्त उत्पन्न कर (इनकम टॅक्स) भरला आहे. १८ कोटी २२ लाख रुपयांचा इनकम टॅक्स बँकेने भरला आहे. ’

‘५०० कोटी रुपयांची तरतूद’
‘शेतकरी, दूध उत्पादक, इंडस्ट्रीज, साखर कारखानदारी, सूत गिरण्या अशा विविध घटकासाठी कर्ज मंजुरीचे धोरण अवलंबलं आहे. बँकेने व्यवसाय वृद्धीसाठी व्यक्तिगत कर्जाच्या विविध योजना अंमलात आणल्या आहेत. म्हैस दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी दूध उत्पादकांना अर्थ पुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी विषयपत्रिकेचे वाचन केलं. सभेतील चर्चेत उद्योगपती व्ही. बी. पाटील, सदाशिव चरापले, प्रा. सुनील शिंत्रे, विशाल आवटी, शमशुद्दीन पिरजादे, धीरज पाटील, सुरेश गायकवाड, अक्रम मुजावर, प्रा. किसन कुराडे यांनी सहभाग घेतला. संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले. सभेला संचालक खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पी. जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, भैय्या माने, सर्जेराव पाटील पेरिडकर, रणजितसिंह पाटील, श्रीमती उदयानी साळुंखे, अर्चना पाटील, तज्ज्ञ संचालक आर. के. पोवार, असिफ फरास , गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here