ग्रामविकास मंत्री यांच्यावर सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पहिला आरोप केला. हा आरोप खोटा असल्याने तो मागे घेऊन माफी न मागितल्यास १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा मुश्रीफांनी दिला होता. दोन आठवड्यात आरोप तर मागे घेतला गेला नाहीच, शिवाय आणखी दोन नवीन घोटाळयांचे आरोप सोमय्या यांनी केले. या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी सोमवारी त्यांच्यावर शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. सहावे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. आर. राणे यांच्यासमोर त्याची सुनावणी झाली.
आपली बदनामी थांबवावी यासाठी सोमय्या यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मनाई आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने या दोघांनाही मनाई आदेश काढला. सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी याबाबतीत काढलेली नोटीस घेण्यास नकार दिला. चंद्रकांत पाटील यांनीही ती नोटीस स्वीकारली नाही. मुश्रीफ यांच्यावतीने अॅड. प्रशांत चिटणीस काम पाहत आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने एकतर्फी सुनावणी घ्यावी, अशी विनंती आपण करणार असल्याचे अॅड. चिटणीस यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
‘न्यायालयाची नोटीस घरी किंवा कार्यालयात येऊन द्यायची असते. कुठेही रस्त्यावर आम्ही नोटीस कशी स्वीकारणार? मुश्रीफांच्या घोटाळ्याबाबत मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा चौथा घोटाळा लवकरच उघडकीस आणणार आहे,’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times