फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे साखरवाडी गावाच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या सामुदायिक शौचालय रस्त्यावर सदर अल्पवयीन मुलगी गेली होती. तेव्हा त्या ठिकाणाहून घरी जात असताना सदर मुलीच्या ओळखीचा किशोर बुद्धादास खुंटे (राहणार साखरवाडी,तालुका- फलटण) हा संशयित आरोपी त्याच्या मोटारसायकलवरून अल्पवयीन मुलीच्या जवळ आला आणि मोटरसायकलवरून उतरून काही न बोलता अचानकपणे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करू लागला.
सदर मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य आरोपीने केलं. त्यानंतर सदर नराधमाने या घटनेबाबत तू घरात कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली आणि मोटरसायकलवरून घटनास्थळाहून निघून गेला.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीने मोठ्या हिमतीने याबाबत आपल्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबियाने पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे संशयित आरोपी किशोर बुद्धादास खुंटे याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times