नवी दिल्लीः नवज्योत सिंग सिद्धू यांनी ( ) पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. काँग्रेस हायकमांडने सिद्धूंचा राजीनामा स्वीकारला नाही आणि आपसात चर्चा करून वाद मिटवण्याची सूचना केली. पण अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या सिद्धूंमुळे काँग्रेस हायकमांडची फजिती उडाली आहे. या सर्व प्रकरणामुळे आता काँग्रेस हायकमांड संतप्त झाली आहे. सिद्धूंचे नखरे यापुढे सहन केले जाणार नाहीत. यानंतरही सिद्धू भूमिकेवर ठाम राहिले तर पक्ष नवीन प्रदेशाध्यक्ष निवडेल, असं संकेत काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.

नवज्योत सिंग सिद्धूंवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पर्यायी नव्या प्रदेशाध्यांच्या नावावर विचारही सुरू केला आहे, असं सांगण्यात येतंय. सिद्धूंच्या ताज्या प्रयत्नांमुळे पंजाबमध्ये पक्षात अराजक स्थिती निर्माण झाल्याने त्यांची हायकमांड कुठलाही संवाद साधणार नाही. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह पंजाबमधील काँग्रेस नेते सिद्धूंचं मन वळण्यासाठी चर्चा करतील. पण त्यानंतरही सिद्धूंनी ऐकलं नाही तर मग काँग्रेस हायकमांडकडून त्यांचा राजीनामा मंजूर केला जाईल आणि नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्त केला जाईल, असा स्पष्ट संदेश काँग्रेस हायकमांडने दिला आहे.

सिद्धूंच्या वर्तनाने आणि पावलाने हायकमांडला धक्का

नवज्योत सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा आणि त्यांच्या वर्तनाने काँग्रेस हायकमांडला धक्का बसला आहे. थेट हायकमांडशी संवाद साधण्याचा मार्ग असतानाही राजीनामा देण्यापूर्वी सिद्धू यांनी पक्ष नेतृत्वाशी कुठलाही चर्चा केली नाही, असं पक्षातील सूत्रांनी सांगितलं. सिद्धूंच्या या पावलामुळे पंजाब काँग्रेसमधील कलह पुन्हा नाजूक वळणावर पोहोचला आहे. तसंच सिद्धूंच्या दबावात अमरिंदर सिंग यांचा बळी घेतल्याने काँग्रेस नेतृत्वावर वरिष्ठ नेत्यांकडून टीका होत आहे.

सिद्धूंच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थनात कायम पुढे असणाऱ्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रांनाही धक्का बसला आहे. राहुल आणि प्रियांक हतबल झाले आहेत. तसंच सिद्धूंसाठी अमरिंदर सिंग यांना बाहेरचा रसत्ता दाखवला गेला. पण आता त्याच सिद्धूंमुळे राहुल आणि प्रियांकांचीही फजिती उडवल्याचं बोललं जात आहे.

सिद्धूंची समजूत घालण्यासाठी निघालेल्या पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांना काँग्रेस हायकमांडने रोखलं आहे. यासोबतच नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांवर विचारही सुरू केला आहे, असं सूत्रांनी सांगितलं. पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो, असा संदेश मुख्यमंत्री चन्नी यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून काँग्रेस हायकमांडने सिद्धूंना दिला आहे.

छोटे-छोटे वाद आणि मतभेद दूर करण्यासाठी सिद्धूंनी पुढाकार घ्यावा. अन्यथा आगामी विधानसभा निवडणूक पाहता लवकरात लवकर नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीचा निर्णय घेतला जाईल. तसंच सिद्धूंना त्यांची मर्यादा दाखवण्याची हीच वेळ आहे, असं काँग्रेस हायकमांडला वाटतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here