पंजाबमध्ये दलित नेत्याला मुख्यमंत्री केल्याने काहींच्या पचनी पडत नाहीए. अमित शहांचे निवासस्थान हे दलितविरोधी राजकारणाचे केंद्र बनले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंबंधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी #NoFarmersNoFood अशा टॅगने एक ट्विट केले आहे. एका दलिताला मुख्यमंत्री बनवले आहे यामुळे सत्तेत बसलेल्या मठाधिपतींचा अहंकार दुखावला गेला आहे. कारण काँग्रेसमध्ये कोण निर्णय घेत आहे? असा प्रश्न ते विचारत आहेत. दलिताला सर्वोच्च पद दिलेले त्यांना आवडले नाही. आणि दलितविरोधी राजकारणाचे केंद्र अमित शहा यांचे निवासस्थान आहे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.
अमित शहा आणि पंतप्रधान मोदी पंजाबवरून सूडाच्या आगीत जळत आहेत. त्यांना पंजाबचा सूड घ्यायचा आहे. कारण शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांद्वारे आपल्या भांडवलदारांचे हित साधण्यात ते अपयशी ठरले आहेत. भाजपचे शेतकरी विरोधी षडयंत्र यशस्वी होणार नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसने दलित नेते चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर चन्नी यांनी २० सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे अरिंदर सिंग आणि अमित शहांच्या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. पुढील काळात अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जातंय. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने अशी शक्यता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार की नाही? यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं एका सूत्राने सांगितलं.
अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत पंजाबमधील सुरक्षेवर चर्चा केली, असं अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं. तर अमरिंदर सिंग हे पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अमरिंदर सिंग हे गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासह ‘ग्रुप २३’मधील काँग्रेसच्या काही नेत्यांचीही भेट घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times