सांगली : ‘ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय आम्ही कधीही सहन करणार नाही. नीतीमूल्य आयोग असो किंवा कृषीमूल्य आयोग असो, त्यांना अधिकार नसताना निव्वळ साखर कारखानदारांचे लांगुलचालन करण्यासाठी अशा प्रकारच्या शिफारसी केल्या आहेत. देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवण्याचा घाट घातला आहे. आता शेतकरीही राज्यकर्त्यांना बघून घेण्याची भाषा करतील,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार यांनी साखर कारखानदार आणि सरकारला दिला आहे. ते गुरुवारी सांगलीत शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून सध्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी व मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे. गुरुवारी सांगलीतील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी एकरकमी एफआरपीबद्दल भूमिका स्पष्ट केली.

राजू शेट्टी म्हणाले, ‘एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी आग्रही आहेत. साखर कारखानदार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे सगळे मिळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. एकरकमी एफआरपी मिळणे हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. तो आम्ही कधीच सोडणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल.’

पावसाचा धुमाकूळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान
मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. ‘राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून मदत दिली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराला अडीच महिने उलटले तरी अद्याप मदत मिळाली नाही. आता तरी सरकारने तातडीने मदत घ्यावी, अन्यथा आम्ही कोणाचाही दसरा आणि दिवाळी गोड होऊ देणार नाही. शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात रस नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. केंद्राने सुद्धा तातडीने पथके पाठवणे आवश्यक होते. मात्र, तसं झालेलं नाही. हजारो कोटी रुपये केंद्राच्या आपत्ती विभागाकडे पडून आहेत. जर तातडीची मदत मिळाली नाही तर शेतकरी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here