धुळे जिल्ह्यातील सोनगीर तालुक्यातील किशोर बट्टू जाधव (२८) हा पुष्पनगरी भागातील एका इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहात होता. सोलापूर आणि गंगापूर येथील दोन मित्र त्याच्या खोलीत सोबत राहायचे. २५ दिवसांपूर्वीच या खोलीत वास्तव्यास आला होता. बुधवारी रात्री त्याने जेवण केल्यानंतर मित्रांसोबत गप्पाही मारल्या. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास किशोरने टोकाचं पाऊल उचललं आणि घराच्या टेरेसवरील ध्वज स्तंभाच्या पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाइड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने छळास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. सकाळी सातच्या सुमारास मित्र झोपेतून उठले असता त्यांना किशोर हा लटकलेल्या अवस्थेत दिसला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक शिर्के यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून घाटी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृत तरुणाच्या खिशातून एक सुसाइड नोट जप्त केली. या चिठ्ठीत त्याने छळास कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं, मात्र कोणाच्या छळास कंटाळून त्याने आत्महत्या केली हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. मयत किशोर जाधव याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, अंत्यसंस्कारानंतर नातेवाईमकांनी तक्रार दिली तर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times