अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती.
मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानं प्रायश्चित्तही घेतलं होतं. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आधीच्या महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता.
हा ठराव विचारार्थ राज्य सरकारकडं पाठवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात २७ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार होती. त्यावेळी छिंदम याला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तो उपस्थित राहिला नाही. त्यामुळं आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यासही छिंदम अनुपस्थित होता. त्यामुळं त्याला अधिक संधी न देता त्याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेक महापुरुषांच्या नावानं हे राज्य चालतं. असं असताना लोकप्रतिनिधीच महापुरुषांचा अवमान करत असतील तर समाजात चुकीचा संदेश जातो. हे खपवून घेतलं जाणार नाही, असं नगरविकास विभागानं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times