सातारा पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात दीपक पवार यांनी बुधवारी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पॅनेल टाकण्याबाबत चर्चा झाली असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन पालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा दीपक पवार यांनी व्यक्त केली.
सातारा पालिकेतील नेमकी राजकीय स्थिती सांगताना दीपक पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विरोधात पक्षाने पॅनेल टाकले नव्हते. पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत कधीच निवडणूक झालेली नाही. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणुकीत पॅनेल टाकावे, अशी लोकभावना आहे. लोकांची मागणी असल्याने सध्या अनेक इच्छुक उमेदवार पक्षाशी संपर्क करून स्वतंत्र पॅनेल टाकावे, अशी मागणी करत आहेत.”
‘अनेक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात’
“सातारा शहरातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही राजांच्या विरोधात पॅनेल टाकू शकते. त्यासाठी पक्षाने मला परवानगी द्यावी,” अशी मागणी दीपक पवार यांनी शरद पवार यांच्यापुढे केली. त्यावर शरद पवार यांनी सर्व म्हणणं ऐकून घेतल्यानंतर लवकरच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी मी स्वत: बसून चर्चा करेन. यामध्ये सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असं सांगितलं.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या विकास आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन पॅनेल उभं करण्याची शक्यता बळावली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times