पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेनं थेट अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. अमित हे गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांचे दौरे करत आहेत. आज ते लोकल ट्रेननं कल्याण-डोंबिवलीला रवाना झाले. त्यावेळी मुंबई व ठाणे महापालिकेच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. ‘रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास लोकांना होतोय. ते हे सगळं बघत आहेत. योग्य वेळी ते उत्तर देतील, असं अमित ठाकरे म्हणाले.
वाचा:
‘एकेका पक्षाकडं २५-२५ वर्षे महापालिकेची सत्ता आहे. एवढ्या वर्षांत त्यांना साधे रस्ते नीट बांधता आलेले नाहीत. रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी इच्छाशक्ती लागते. नाशिक शहरातील रस्ते पाहिल्यावर तुम्हाला हे समजेल. नाशिकच्या रस्त्यावर एक खड्डा नाही. मनसेनं पाच वर्षांत हे करून दाखवलं आहे. राज साहेबांनी इच्छाशक्ती दाखवल्यामुळं नाशिकमध्ये बदल घडून आलाय. पुढची ४० वर्षे नाशिकला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, असं काम मनसेनं करून ठेवलंय आणि तुम्हाला २५ वर्षांत रस्ते बांधता येत नाहीत,’ असा संतप्त सवाल अमित ठाकरे यांनी केला.
वाचा:
दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असं शिवसेनेच्या नेत्यांकडून व महापौरांकडून सांगण्यात आलं आहे. त्याबाबत विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले, ‘आता ठेकेदारांवर कारवाई करायची भाषा केली जात आहे. पण हे फक्त चार दिवसांचं आहे. मीडियासाठी हे सगळं बोललं जात आहे. ठेकेदारांवर कारवाईच्या घोषणा करण्याऐवजी आधीच तुम्हाला चांगले रस्ते बांधून घेता आले नाहीत का? ठेकेदारांनी तुम्हाला न विचारताच रस्ते बांधले का? लागेबांधे असल्यामुळंच शहरांची ही अवस्था झाली आहे. जो पर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत खड्डे तसेच राहणार. शहरांमध्ये सुधारणा होणार नाही,’ असंही अमित ठाकरे म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times