धनंजय मुंडे मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. आम्ही रात्री अनेक लोकांना पुरातून बाहेर काढलेले आहे,असे असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंची टीका
मदतीच्या आश्वासनाचे काय असा माझा प्रश्न असून पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार आजी-आजोबा आहे. त्यामुळे केंद्राची मदत येईलच. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
क्लिक करा आणि वाचा-
धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
स्वत: पंकजा मुंडे यांच अमेरिकेत गायब झाल्याचा टोला हाणतानाच तुमची चांगली भावना असती तर मागच्या अतिवृष्टीत तुम्ही बांधावर दिसला असता, असे मुंडे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेली आहे. मी येथील सर्व परिस्थिती कथन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. बीड जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बीडला सरसकट तातडीने मदत मिळावी अशी आमची मागणी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘शरद शतम’ योजनेबाबत दिली माहिती
पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरू होत असलेल्या आरोग्य योजनेबाबत माहिती दिली. शरद पवार यांच्या नावाने राज्यात वृद्धांसाठी आरोग्य योजना सुरू होत आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचे ‘शरद शतम’ असे नाव आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील ६५ वर्षांवरील सर्व नागरिकांना काही मोफत तपासण्या करता येणार आहेत. या चाचण्या वर्षातून एकदा केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमुळे आजाराचे निदान वेळेवर होऊन वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times