जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे येथे आज शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. या सभेत बोलताना माजी मंत्री यांनी ईडीच्या चौकशीवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. खडसे यांना ईडीने अटक केली आणि त्यांचा फार्म हाऊसवर जप्त केला गेला, अशी चर्चा दोन दिवसांपूर्वी सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, खडसे यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगून दोन दिवस खासगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे स्पष्ट केले होते. बाहेर गावाहून परतल्यानतंर आज खडसेंनी बोदवड येथील सभेत आपली भूमिका मांडली.
‘बीएचआर पतसंस्थेचा विषय लावून धरल्याने आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आली. य घोटाळ्यातच खरे दुखणे आहे. बीएचआर प्रकरणात हजारो ठेवीदारांचा घामाचा व रक्ताचा पैसा आहे. अनेक ठेवीदारांचे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचे पैसे बुडू देणार नाही, याबाबत आपण ठेवीदारांना आश्वासन दिले आहे. यांच्या प्रॉपर्टी विकायला लावेल मात्र ठेवीदारांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी आपली भूमिका आहे. यात काहींच्या जवळच्या लोकांना अटक झाली. आणखी काही जण आगामी काळात जेलमध्ये जातील, असा दावाही खडसे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांची उपस्थिती होती.
यांच्याकडे १२०० कोटींची संपत्ती कशी?
‘माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांच्याकडे मोठी शेतजमीन आणि वाडे होते. त्याचे तेव्हपासूनचे उतारेही आहेत. आपण काही भीक मागणारे किंवा कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. तरीही आपल्या प्रॉपर्टीची दहा वेळा चौकशी करण्यात आली. मात्र, त्याचे वडील तर साधे शिक्षक होते मग त्याने हजार ते बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी कशी जमवली? त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल खडसेंनी कोणाचेही नाव न घेता केला. बेनामी संपत्तीचा विचार करता हा आकडा अजून मोठा असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times