नवरगाव येथील बिर्रा जिगरवार, ज्ञानेश्वर मर्लावार, मल्ला बाकीरवार, बुधाजी कंकलवार, बुधाजी रेगडवार, मनोहर कड्रीवार ह्या शेळ्या मालकांचा सुमारे १३० शेळ्यांचा कळप आलेसूर गावालगतच्या शेतशिवारात चराईसाठी कैलास सिद्धमवार, मल्ला बाकीरवार ह्या मेढपाळांनी नेला होता.
दुपारी दिड वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यासह या परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे शेळयांचा कळप आंब्याच्या झाडाखाली गोळा झाला होता. दरम्यान जोरदार सुरू असलेल्या पावसासोबत मेघगर्जना होवून आंब्याच्या झाडावर वीज पडल्याने ३-४ मोठया बोकडा सह २६ शेळ्या जागीच ठार झाल्या. यात शेळ्यामालकांचे सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. २६ शेळया विजेने ठार झाल्याची माहिती गावात होताच नागरीकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली.
आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी शेतकरी शेतीसोबत शेळीपालनाच्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे त्यांनी बघितलेल्या स्वप्नाचा चुराडा होत आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत प्रदान करावी अशी मागणी शेळी मालकांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times