मुंबईः ‘पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार का? या प्रश्नांवर अमरिंदर म्हणाले मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले. शेतकरी आंदोलन, सीम सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असे धादांत खोटे ते बोलतात. हे विषय खरोखरच महत्त्वाचे असतील तर गृहमंत्र्यांनी पंजाबच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांशीच चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे. तसंच, केंद्र सरकार हे नवे पायंडे पाडत आहे ते बरे नाही, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर देशभरात चर्चांना उधाण आलं होतं. यावर शिवसेनेनंही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

‘काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात आहे. तेथेही अनेकदा लोकप्रिय सरकारला डावलून केंद्राचे लोक विरोधी पक्षाला चर्चेसाठी बोलावतात. विरोधी पक्षाच्या सूचनेनुसार प. बंगालसंदर्भात निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात व राज्याच्या बाबतीत केंद्राचे कान भरतात. जणू विरोधकांचे नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असते व त्यासाठी सर्व लोक दिल्लीस जात असतात,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः

‘काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार महामंडळाने ‘जी-२३’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱ्या अर्कां’ ना खटकत आहे’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. पंजाबातील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले. भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता. ते सर्व पर्व संपवून पंजाबने नवा अध्याय सुरू केला. पंजाबात पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

वाचाः
‘देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here